विरारमध्ये राहणाऱ्या निशांत नरेश कदम या बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाली. सोमवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास शिवमंदिरात दर्शनासाठी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यावर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
निशांत कदम हे विरारमधील फुलपाडा येथे राहत होते. श्रावण महिना असल्याने ते दर सोमवारी पापडखिंड येथील शिव मंदिरात दर्शनासाठी जात होते. कोरोना काळात सर्व ठिकाणची मंदिरे बंद असताना पहाटेच्या वेळी दर्शनासाठी हे मंदिर खुले केले जायचे. श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार असल्याने कदम हे मंदिरात जात असताना अंधारात झाडाच्या मागे लपलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारून धारदार शस्त्राने हल्ला केला. जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने निशांत यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरही अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
हे ही वाचा:
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी
सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी
लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज
गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या
मृताच्या नातेवाइकांनी काही संशयितांची नावे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. निशांत यांना काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. निशांत यांचा भाऊ निखील याने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे, ही हत्या नेमकी कोणी आणि का केली, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.