कोल्हापूरच्या व्यापाऱ्याला हनी ट्रॅप अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १० ने एका महिलेसह तिघांना अटक केली असून एक महिला फरार असून तीचा शोध घेण्यात येत आहे.
लुबना अझान वझीर उर्फ सपना (४७),अनिल बन्सीलाल चौधरी उर्फ आकाश (४२) आणि मनिष सोदी (४१) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून मोनिका देव उर्फ मोनिका चौधरी ही फरार झाली आहे.
कोल्हापूर येथे राहणाऱ्या एका बड्या व्यापऱ्याची गोव्यात २०१९ मध्ये अनिल चौधरी उर्फ आकाश याच्यासोबत भेट झाली होती. अनिल उर्फ आकाश याने मुंबईत माझे सोन्याचांदीचे दुकान असल्याचे या व्यापाऱ्याला सांगितले होते. तुम्ही एकदा मुंबईत या असे त्याने या व्यापाऱ्याला निमंत्रण दिले होते. व्यापारी एके दिवशी मुंबईत कामासाठी आले व त्यांनी अनिल उर्फ आकाश याला भेटण्यासाठी बोलावले. दरम्यान अनिल उर्फ आकाश हा भेटण्यासाठी गेला व या व्यापाऱ्याला मुंबई विमानतळजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय केली. दरम्यान अनिल उर्फ आकाश याने एका महिलेची व्यापाऱ्यासोबत भेट घालून ती मॉडेल असल्याचे सांगितले. तिने देखील आपली बडे अधिकारी, मंत्री आमदार यांच्यासोबत ओळख असल्याचे या व्यापाऱ्याला सांगितले. दरम्यान, मोनिका देव ही महिला देखील रूमवर भेटायला आली असता अनिल उर्फ आकाश याने काम असल्याचे सांगून हॉटेल मधून बाहेर पडला.
त्याच वेळी या दोघींपैकी एकीने कोल्हापूरच्या व्यापाऱ्याशी लगट करून त्याच्यासोबत अश्लील चाळे सुरू केले आणि दुसरीने या सर्व आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले. पीडित व्यापारी याला हनीट्रॅप मध्ये अडकवल्यानंतर या दोघीनी मनिष सोदी याच्या मदतीने कोल्हापूरचे व्यापारी यांना व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन मागील तीन वर्षात ३ कोटी रुपयांची खंडणी वसूल केली. पीडित सतत तणावात असल्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घडलेली सर्व हकीकत मुलाला सांगितली. तसेच ही टोळी मोबाईलवर मेसेज करून सतत धमकी देत असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम
न्यूझीलंड सोबत आज दुसरा टी२० सामना! भारताला मालिका विजयाची संधी
बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही
मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही
मुलाने वडिलांना विश्वासात घेऊन त्यांची हिंमत वाढवली व दोघे गेल्या आठवड्यात सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसानी खंडणीच्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान मुंबई गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने या टोळीचा शोध घेऊन तिघांना अटक केली असून मोनिका देव ही फरार आहे.