ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेकडून दणका मिळाला असून एका शाखेवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाजवळच ही शाखा आहे. ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक ९६ चे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय आहे. तर, फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कार्यालयावर आता कारवाई करण्यात आली आहे.
वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट
मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’
पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू
कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी
ज्या शाखेवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे ती शाखा ४० वर्षे जुनी आहे. १९९५ च्या झोपड्यादेखील आपण अधिकृत केल्या आहेत. मग ४० वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असं महापालिका कसं म्हणू शकते? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत १० कोटींची ऑफर नाकारल्यामुळे ही कारवाई झाल्याचं म्हटलं आहे. या कारवाई आधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. ऑफर स्वीकारली नाही म्हणून ही कारवाई केल्याचा आरोप खान यांनी केला आहे.