बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. ३० जून आणि १ जुलै रोजीच्या मध्यरात्री झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अपघातात चालकाची चूक असल्याची शक्यता आहे.
बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला असून या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, चालक शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा ३० टक्क्यांपेक्षा जास्त होते. राज्यात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण हे १०० मिलिलीटर रक्तात ३० मिलीग्राम अल्कोहोल एवढं आहे.
मात्र, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे १ जुलैच्या मध्यरात्री घडलेला अपघात ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या भीषण अपघातात २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले
मुंबईच्या पूर्व उपनगरातून ८० सराईत गुन्हेगार हद्दपार
महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
अपघात कसा झाला?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला होता. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. बसमध्ये एकूण ३३ प्रवास होते. आठ प्रवाशांना सुदैवाने गाडीने पेट घ्यायच्या आत बाहेर पडता आले. मात्र, २५ प्रवाशी आत अडकून पडल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं फार कमी लोकांना बस बाहेर पडण्याची संधी मिळाली. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले.