माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात आणखी एका बड्या व्यक्तीचे नाव समोर येत आहे, मुंबईत सुरू असलेल्या रियल इस्टेट मध्ये कोट्यवधीची गुंतवणूक करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव या हत्याकांडात समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या व्यवसायिकाचे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे, ते व्यावसायिक एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या निकटवर्तीय असल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत कुठलाही अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी “आम्ही सर्व बाजूनी तपास करीत आहोत, असे पोलिसां
कडून सांगण्यात येत आहे.
वांद्रे येथील माजी आमदार आणि राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी वांद्रे पूर्व येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरापैकी दोन जणांना जागेवर पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर हे भाडोत्री गुंड असून त्यांचे दोन सहकारी अद्याप फरार आहेत. त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होत नसले तरी साबरमती कारागृहात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे नाव या हत्याकांडात जोडले जात आहे. मात्र पोलिसांकडून लॉरेन्स बिष्णोई संदर्भात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
आरोपी गुरुनैलला पोलीस कोठडी तर आरोपी धर्मराजच्या वयाची चाचणी!
अमेरिकेने रेवडी वाटली, केजरीवालांना गोड लागली!
बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’
‘जो सलमान, दाउदची मदत करणार त्याचा हिशोब करणार’
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध रियल इस्टेट तसेच वांद्रे पूर्वेतील एका एसआरए प्रकल्पा सोबत जोडला जात आहे, तसेच सिद्दीकी यांचे कोणाशी वैर होते का हे देखील तपासले जात असताना एक नाव पुढे आले आहे. बांधकाम व्यवसायातील हे नाव मोठे आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार वांद्रे पूर्व येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या एका मोठ्या प्रकल्पात या व्यवसायिकाचे कोट्यवधी रुपये गुंतलेले आहेत. या प्रकल्पाला बाबा सिद्दीकी यांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प तात्पुरता थांबविण्यात आला आहे,असेही समजते की या प्रकल्पाविरोधात बाबा सिद्दीकी आणि त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकी हे आंदोलन करणार होते अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून मात्र अद्याप या व्यावसायिकांचे नाव उघड केलेले नसून आम्ही सर्व बाजू तपासून बघत असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, सिद्दीकी यांच्या हत्येशी संबंधित आम्ही चारही बाजूनी चौकशी करीत आहोत,या प्रकरणात त्या व्यावसायिकाचा संबंध आढळल्यास संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी बोलावू, परंतु तूर्तास आम्ही फरार असणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेत आहोत. हल्लेखोरांचा चौकशीत ज्या व्यक्तीचे नाव समोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही चौकशीसाठी बोलावू असे एका अधिकाऱ्यानी म्हटले आहे.