माहीम येथील बांधकाम व्यवसायिकाकडे आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून गँगस्टर गुरु साटमच्या नावाने धमकी देऊन ५ कोटी रुपये आणि बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत एका फ्लॅटची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधी पथक या गुन्ह्याचा तपास करीत आहे. या धमकीमुळे मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. माहीम या ठिकाणी एका बड्या बांधकाम व्यवसायिकाचे बांधकाम सुरु आहे.बांधकाम व्यवसायिकाला एका आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणारा स्वतःला गुरु साटम असल्याचे सांगत होता व माहीम मध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या एक फ्लॅट आणि ५ कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली व खंडणी दिली नाही तर जीव मारण्याची धमकी दिली.
धमकीच्या कॉलमुळे घाबरलेल्या बांधकाम व्यवसायिकाने माहीम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. माहीम पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून हा कॉल कुठून आला याची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा संलग्न तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक करीत आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
परमबीर सिंग यांना एसीबीकडून तिसरे समन्स..
काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण
गुरु साटम हा मागील दोन दशकापासून परदेशात वास्तव्यास असून गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात त्याचे कुठेही नाव आलेले नसून गुरु साटम ह्यात आहे कि नाही हे देखील अद्याप कुणाला माहिती नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र मागील काही वर्षांपूर्वी त्याच्या नावाने दादर, परळ येथे खंडणीचे कॉल करण्यात येत होते, याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली होती मात्र गुरु साटम याबाबत काहीही माहिती कळून शकेल नाही.