सहा आरोपींसह १५ जणांवर गुन्हा दाखल
देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध लादले आहेत. परंतु संगमनेरमध्ये काही नागरिक हे नियम न पाळता जमाव करून उभे राहिले असल्याचे पोलिसांच्या दृष्टीस पडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कोविडचे नियम पाळून उभे राहण्याची विनंती केली असता, जमावाने पोलिसांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली तसेच दगडफेक करून दहशत पसरवण्याचा देखील प्रयत्न केला.
या नंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत सहा आरोपींसह इतर १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या नागरिकांवर शासकीय कामात अडथळा आणण्यापासून ते साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
संगमनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या लखीमपुरा भागात मोठा जमाव जमला होता. यावेळी गस्तीवर असलेल्या राज्य राखीव दलाची तुकडी तिथे पोहोचली. या जमावापैकी बहुतेकांनी मास्क घातला नव्हता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात नव्हते. त्यामुळे गस्तीवरील जवानांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावातील काही माथेफिरूंनी पोलिसांवर हल्ला करत, तिनबत्ती चौकातील पोलिसांच्या निवाऱ्यासाठी उभारलेला तंबूही उखाडून टाकला. यावेळी चौकात सुमारे शंभर ते दीडशे लोकांचा जमाव गोळा झाला. त्यांनी पोलिसांना शिविगाळ आणि धक्काबुक्की करायला सुरूवात केली. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना माघार घ्यावी लागली. या प्रकरणात काही खासगी वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.
याप्रकरणात पोलिस हवालदार सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक व तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचाडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या आरोपींसह अन्य दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५२, ३३२, ३३७ यांच्यासह दंगलीची कलमे १४३, १४७ तसेच १८८, २६९ आणि क्रिमिनल अमेंडमेंट कायदा १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या घटनेतील बहुतेक लोक फरार असल्याचे सांगितले जात आहे.