सध्या कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात प्रमुख कुस्तीगीरांनी आंदोलन छेडले असून त्या खेळाडूंच्या समाधानासाठी आपण राजीनामा देण्यासही तयार आहोत, असे बृजभूषण यांनी इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी तुमच्याविरोधात एफआयआर करण्याची तयारी दाखविली आहे, तुम्हाला निर्णय मान्य आहे का, यावर बृजभूषण म्हणाले की, मी न्यायालयाच्या निर्णयाने संतुष्ट आहे. खेळाडूंची मागणी होती त्यासाठी ते आंदोलन करत होते. सर्वोच्च न्यायालयात गेले होते. माझ्याविरोधआत एफआयआर दाखल करा मी संतुष्ट आहे. मी चौकशीला सामोरा जाण्यास तयार आहे.
या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का, या प्रश्नावर बृजभूषण म्हणाले की, मी देशाचा नागरीक आहे. सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठे न्यायालय आहे. त्यावर मी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. जो काही त्यांनी निर्णय घेतला मी तो स्वीकारतो. मग तुम्ही राजीनामा देणार का या प्रश्नावर बृजभूषण म्हणाले की, खेळाडूंच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. प्रारंभी त्यांनी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती नंतर ते लैंगिक अत्याचाराचा मामला घेऊन आले. मग चौकशी करा अशी मागणी आली. दोन समित्या स्थापन केल्या पण त्याबद्दल त्या समाधानी नव्हते.
टीव्ही वाहिनीचे अँकर सुधीर चौधरी यांना ते म्हणाले की, राजीनाम्याने जर ते संतुष्ट असतील तर मी तुम्हालाच पाठवतो राजीनामा. तुम्ही त्यांना पाठवून द्या. खेळाडूंनी आपला सराव करावा पण तुम्ही म्हणालात तर मी राजीनामा देईन. पण अपराधी म्हणून नाही, असे बृजभूषण यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पोलिसांनी पानटपऱ्या कातरल्या; ५०० दुकानांवर कारवाई
ठाकरेंच्या रथाचे चाक बारसूमध्ये रुतणार…
चित्ते मृत्यू प्रकरणी दक्षिण आफ्रिकेकडून मोदींची पाठराखण
बारसूत शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण
सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल
दिल्लीत भारताच्या प्रमुख कुस्तीगीरांनी आंदोलन करत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बृजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केले आहेत. ते लैंगिक अत्याचारासंदर्भात आहेत. कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात हे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लहान कुस्तीगीरांनी यातील एक एफआयआर दाखल केला आहे. दुसरा एफआयआर हा यातील कुस्तीगीरांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशीची मागणी करणारा आहे. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक या देशातील अग्रगण्य कुस्तीगीरांनी हे आंदोलन हाती घेतले आहे. जोपर्यंत बृजभूषण यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरू ठेवू असे या खेळाडूंनी म्हटले आहे.