बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकतो!

दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात नोंदविले निष्कर्ष

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकतो!

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकतो असा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात केलेल्या आरोपपत्रात काढला आहे.

दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याचसंदर्भात गेले काही महिने प्रमुख कुस्तीगीरांनी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यात विनेश फोगाट, बजरंग पुनिया व साक्षी मलिक हे प्रमुख खेळाडू होते. त्यांनी बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर खेळाडूंचे जबाब घेतले गेले. बृजभूषण यांचेही यासंदर्भातील म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले आहे.

 

 

या आरोपपत्रात म्हटले आहे की, बृजभूषण यांच्याविरोधात संबंधित खेळाडूंच्या मागावर राहणे, त्यांना छेडणे या प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते. त्यांच्याविरोधात जे ६ गुन्हे दाखल आहेत त्यातील एकात त्यांनी खेळाडूचा पाठलाग केल्याचे प्रकरणही आहे.

हे ही वाचा:

स्वीडनचे ‘नाटो, नाटो’…लवकरच सहभागी होणार!

देशभरात अतिवृष्टीमुळे एका दिवसात ५६ जणांनी गमावला प्राण

भारतीय वंशाच्या चार महिलांनी मिळविले अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत स्थान

चीनच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर?

 

पोलिसांनी एफआयआरमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केल्याबद्दल ५०६हे कलम लावले असून महिलांची छेड काढल्याबद्दल ३५४ कलम लावण्यात आले आहे. लैंगिक शोषणासाठी ३५४ (अ) या कलमाचाही वापर करण्यात आला आहे. जर बृजभूषण यांना यासंदर्भात दोषी धऱण्यात आले तर त्यांना पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी यासंदर्भात १०८ साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यात रेफ्री, कुस्तीगीर, प्रशिक्षक यांचाही समावेश आहे.

 

 

१८ जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या कोर्टाने बृजभूषण यांना समन्स जारी केले आहे. त्यांना स्वतः न्यायालयात हजर राहावे लागेल. बृजभूषण यांच्याविरोधात ७ जणांनी तक्रार दाखल केली आहे. त्यातील एका अल्पवयीन कुस्तीगीर मुलीने तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे बृजभूषण यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत कारवाई टळली आहे.

 

 

या कुस्तीगीरांनी २३ एप्रिलला बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते. ते २८ मे पर्यंत चालले. पण नंतर ते आंदोलन स्थगित झाले आणि नंतर पुन्हा एकदा खेळाडू आंदोलनाला बसले. तोपर्यंत बृजभूषण यांच्यावर एफआयआर नोंदविला गेला नव्हता.

माजी बॉक्सर मेरी कोमच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भातील अहवाल क्रीडा मंत्रालयाकडे सुपूर्द केला होता पण या अहवालात बृजभूषण यांच्याविरोधात पोलिसी कारवाई व्हायला हवी किंवा या तक्रारीत काही तथ्य आहे असे काहीही नमूद केलेले नव्हते, असे म्हटले जाते.

Exit mobile version