दहिसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बॅनर लावण्यावरून वाद झाला. या वादातून शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात भाजपा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी जखमी कार्यकर्ता बिभिषण वारे याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. या हल्ल्याप्रकरणी आता दहिसर पोलीसांनी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
यासंदर्भातील जो गुन्हा दाखल केला आहे त्यात वारे याने घटनाक्रम सांगितला असून त्यात सहभागी असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची नावेही सांगितली आहेत. वारे याने म्हटले आहे की, आपला मित्र नवनाथ नावाडकर याने भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचे अभिनंदन करणारा बॅनर आम्हाला दहिसर येथील चिंतामणी प्लाझा समोर लावायचा होता. त्याठिकाणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा ड्रेनेज लाइनच्या भूमीपूजनाचा बॅनर लागला होता. पण तो कार्यक्रम झालेला असल्याने रात्री १०.३० वाजता तो बॅनर काढून तो विभूती नारायण शाळेच्या बाजुला लावला आणि चिंतामणी प्लाझा समोर नवाडकर यांचे अभिनंदन करणारा बॅनर लावला. रात्री ११.१५ वाजता अनिल गिंबल या मित्रासह हनुमान टेकडी येथे उभे राहून बोलत असताना सुनील मांडवी आणि माझी चिंतामणी प्लाझाजवळचा बॅनर काढून टाकण्याबाबत आणि तिथे पुन्हा प्रकाश सुर्वे यांचा बॅनर लावण्याबाबत चर्चा झाली. तसे करण्यास आपण मांडवे यांना सांगितले.
हे ही वाचा:
पन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात
‘सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है’ यावरून राहुल गांधी निशाण्यावर
मार्चमध्ये शेअर बाजारात झाली इतक्या कोटींची घसघशीत गुंतवणूक
ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स
मांडवे याने रात्री १.३० च्या सुमारास फोन करून तो बॅनर काढून ठेवला असून तो घेऊन जा असे सांगितले. मी नवाडकर यांच्या अभिनंदनाचा बॅनर दुसरीकडे लावून घेतो असेही सांगितले. त्यानंतर माझ्या परिचयाचा अनिल दबडे माझ्याजवळ आला आणि माझे मांडवे यांच्याशी काय बोलणे झाले हे विचारले. तेव्हा आपल्याला आता वाद घालायचा नाही, असे त्याला सांगितले. त्यानंतर रात्री दबडे, सुनील मांडवे, आशीष नायर, नितेश उतेकर, सोनू पालांडे, मयूर वाघेला, समीर कोटी हे माझ्याकडे आले आणि त्यांच्या हातात बांबू होता. आशीष नायरच्या हातात लोखंडी रॉड, सोनू पालांडेच्या हाती चॉपर होता. त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी पळालो. माझा मित्र सूरज सूर्यवंशी याने मला कांदिवली येथील बाबासाहेब रुग्णालयात नेले. त्यानंतर मी या सगळ्यांविरोधात दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
यासंदर्भात आता दोन शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.