दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पोलिसांकडून तपास सुरू

दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीतील शाळांना धमकी मिळण्याचे सत्र सुरूचं असून पुन्हा एकदा दिल्लीतील सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी सहा शाळांना त्यांच्या ईमेलवर धमकी प्राप्त झाली आहे. या घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहचळे आहेत. अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही तसेच तपास देखील अजून सुरु असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

यापूर्वी दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना ८ डिसेंबर रोजी असाच धमकीचा ईमेल आला होता. ज्यात डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूलचा समावेश होता. ज्यामध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. बॉम्बचा स्फोट झाल्यास मोठी हानी होईल, असे मेलमध्ये म्हटले होते. मेल पाठवणाऱ्याने स्फोट थांबवण्याच्या बदल्यात ३० हजार डॉलर्सची मागणी केली होती. धमकीचे सत्र सुरूचं राहिल्याने राजधानीमध्ये खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील शाळांना रविवार, ८ डिसेंबर रोजी रात्री ११.३८ च्या सुमारास मेल आला. आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह ४० शाळा व्यवस्थापनांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. पुढे कारवाई होईपर्यंत मुले त्यांच्या वर्गासाठी पोहोचली होती. मात्र, धमकीच्या मेलनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ मुलांना घरी पाठवून पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांत शाळांना अशा धमक्या अनेकदा आल्या आहेत. मात्र, त्यानंतर अफवा असल्याचे समोर आलं होतं.

हे ही वाचा :

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी देश एकजुटीने उभा

गुकेश ठरला ६४ घरांचा सर्वात तरुण विश्वविजेता!

रत्नागिरीत वायू गळती, ३० हून अधिक विद्यार्थ्यांना श्वसनासह उलट्यांचा त्रास!

जॉर्ज सोरोस हाच होता यूपीए सरकारचा रिंग मास्टर? ठाकरे- पवार विचारणार का जाब?

अलीकडच्या काही महिन्यांत अनेक भारतीय विमान कंपन्या, हॉटेल्स, रेल्वे स्थानकांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. पुढे तपासाअंती त्या सर्व फसव्या ठरल्या आहेत. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विमान कंपन्यांना फसव्या धमकीच्या कॉलची संख्या २०२३ मध्ये १२२ वरून २०२४ मध्ये ९९४ पर्यंत वाढली आहे. एकट्या ऑक्टोबरमध्ये, विमान कंपन्यांना ६६६ बॉम्बच्या धमकीचे कॉल आले होते जे या वर्षातील सर्वाधिक होते. त्यानंतर जूनमध्ये १२२ धमक्या आल्या. याउलट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये केवळ १५ धमकीचे कॉल रेकॉर्ड केले गेले, जे गेल्या वर्षी सर्वाधिक होते.

Exit mobile version