महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे मुंबई आणि पुणे येथे बॉम्बस्फोट घडवून येणार असल्याच्या धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्याची माहिती समोर आली आहे. या फोनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अंधेरी, कुर्ला भागात उद्या म्हणजेच २४ जून २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे.
मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या या फोन कॉलवरील धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने काल सकाळी १० वाजता पोलीस कंट्रोल रुमला कॉल केला आणि २४ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी माध्यमांना दिली.
फोन करणाऱ्या अज्ञात इसमाने सांगितले की, त्याला दोन लाख रुपयांची गरज असून ही रक्कम मिळाली की तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच, पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहे आणि तो स्वतः हा स्फोट घडवून आणणार आहे. त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असे त्याने सांगितले.
हे ही वाचा:
१६४ बनावट खात्यांमधून गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकिटींचे आरक्षण
महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय… म्हणत आशिष शेलारांचे ठाकरेंना सवाल
‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’
‘टायटन’ पाणबुडीवरील ते पाचजण ‘खरे शोधक’ होते
पोलीस तपासानुसार, हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम ५०५ (१) (ब), ५०५ (२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.