पंजाब मधील लुधियाना येथे बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. लुधियाना येथील शहर न्यायालयात हा बॉम्बस्फोट झाला आहे.या बॉम्बस्फोटात दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समजते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेने सारा परिसर हादरून गेला आहे. लुधियाना कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर हा भीषण असा बॉम्बस्फोट झाला आहे.
गुरुवार, २३ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. लुधियाना जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज हे नेहमीप्रमाणे सुरु होते. अशातच लुधियाना न्यायालयाच्या तीन मजली इमारतीतून स्फोटाचा आवाज झाला. या स्फोटाने आजूबाजूचा साराच परिसर हादरून गेला. न्यायालयात उपस्थित असलेले वकील, न्यायालयातील कर्मचारी, पोलीस अधिकारी, उपस्थित असलेले सामान्य नागरिक या साऱ्यांनाच धडकी भरली. अचानक झालेल्या या स्फोटात न्यायालयीन इमारतीचे नुकसान झाले असून काही माणसे जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. तर दोन जणांचा या स्फोटात मृत्यू झाल्याचेही समजत आहे.
हे ही वाचा:
माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी
दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाकडे पाठ?
१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत
भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी उपस्थित नागरिकांना घटनास्थळापासून सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकरवी मृतदेह शोधण्याचे कामही सुरु आहे. पोलिसांचे पथक संपूर्ण जागेचा तपास करत आहे. हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला आहे.
दरम्यान या स्फोटामागचे मुख्य कारण अद्यापही समोर आलेले नाही. हा स्फोट घडला की घडवला गेला? याची कोणतीही स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही. पण न्यायालया सारख्या सुरक्षा कवच असलेल्या इमारतीत हा स्फोट घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.