बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीला सायबर गुन्हेगाराकडून दीड लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. केवायसी अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन हा गंडा घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे पश्चिम येथे राहणारा बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी याने वांद्रे पोलीस ठाण्यात सोमवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने म्हटले आहे की, “८ ऑक्टोबर रोजी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, त्या मेसेज मध्ये “त्याचे अक्सेस बँकेचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे, खाते सुरू करण्यासाठी पॅनकार्ड आणि आधार अपडेट करावे लागेल” मेसेज सोबत एक लिंक देण्यात आली होती या लिंक वर आफताब याने क्लिक केल्यानंतर त्याला काही वेळातच एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि त्याने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने आफताबला त्याच्या खात्याशी संबंधित खाजगी माहिती टाकण्यासाठी मार्गदर्शन केले, त्यानंतर त्याच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ९९९ रुपये डेबिट झाले.
हे ही वाचा:
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; तारखा जाहीर
श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार
ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या
भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय
काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच आफताबने सोमवारी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मॅनेजरने त्याला डेबिट झालेल्या पैशांबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आफताबने वांद्रे पोलीस ठाणे गाठले, सोमवारी त्याने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वांद्रे पोलिसांनी भादवि कलम ४१९ आणि ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान ( IT act) कायद्याच्या कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.