कुठलीही वैद्यकीय पदवी नाही, कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसलेल्या डॉक्टरांनी गोवंडीत दवाखाने थाटून गरीब जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आले आहे.
गुन्हे शाखेने गोवंडी बैंगणवाडी येथे पाच दवाखान्यावर छापे टाकून पाच बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. ही कारवाई मनपाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी केली आहे. या पाचही जणांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
क्षमा क्लिनिक, आलिशा क्लिनिक,आशिफा क्लिनिक, रहेमत क्लिनिक आणि मिश्रा क्लिनिक असे कारवाई करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांनी थाटलेल्या दवाखान्याची नावे आहेत. हे दवाखाने गोवंडी शिवाजी नगरातील बैंगणवाडी परिसरात होती. दवाखाने चालवणारे डॉक्टराकडे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी अथवा प्रमाणपत्र नसून त्यांनी कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण घेतले नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. केवळ दहावी-बारावी शिक्षण घेतलेल्या या बोगस डॉक्टरांनी स्वतःचे क्लिनिक सुरू करून गोवंडी शिवाजी नगरातील गरीब आणि अशिक्षित जनतेच्या जीवाशी मागील अनेक वर्षांपासून खेळत होते.
हे ही वाचा:
उद्धवचा काळ संपला, लवकरच भाजपाची सत्ता येणार
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश
‘अद्यप्रभृतिः आरभते संस्कृतसप्ताहः’ अर्थात आजपासून सुरू होणार संस्कृत सप्ताह
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
कोरोनाच्या काळात या बोगस डॉक्टरांनी या परिसरातील नागरिकांवर उपचार करून गरिबांची लूट केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ६ यांनी या बोगस डॉक्टरांची माहिती मिळवून त्याची यादी तयार करून मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पाठवून बुधवारी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. प्रिया कोळी यांच्या मदतीने छापे टाकण्यात आले.
या पाचही डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्याच्या क्लिनिकमधून अँटिबायोटिक औषधे, विविध इंजेक्शन आणि इतर सामुग्री जप्त करून क्लिनिक सील करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. या पाचही झोला छाप डॉक्टरांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र वैद्यकीय प्रशिक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.