चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट सारा यंथन (वय २६) हिच्या मृत्यूने खारघरमध्ये खळबळ उडाली. मंगळवार, २० जून रोजी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. खार दांडा येथे सारा भाड्याच्या घरात राहत होती. साराच्या हातावर जखमा आणि रक्त आढळून आल्याने पोलिसांना साराची हत्या झाल्याचा संशय आहे. सारा ही मूळची नागालँड येथील होती. ती मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेब सिरीजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती.
रविवार सकाळपासून सारा कोणाच्याही फोनला प्रतिसाद देत नव्हती. तसेच तिच्या घराचे थकलेले भाडे घेण्यासाठी एजंट घराजवळ पोहचताच आतून प्रतिसाद येत नसल्याचे पाहून त्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात दिसली. तसेच तिच्या दोन्ही हातांवर कापल्याच्या खुणाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी खार पोलीस अधिकचा तपास करत असून तिची हत्या करून गळफास लावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विधान भवनात योग दिवस केला साजरा
लष्कर ए तोयबाच्या साजीद मीरला काळ्या यादीत टाकण्यासाठी कुरापती चीनचा नकार
‘गद्दार दिना’शी राष्ट्रवादीचा काय संबंध?
अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले
एका बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीसोबत साराचे संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, असा आरोप साराच्या कुटुंबीयांनी केला आहे. नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांनीही मुंबईत धाव घेतली. पोलिसांनी कूपर रुग्णालयामध्ये सारा यंथनचे शवविच्छेदन केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला. त्यावेळी रोझी म्हणाल्या की, रिझर्व बँकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबतच्या नात्याबद्दल तिने कल्पना दिली होती. तो माणूस लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचेही तिने सांगितले होते. साराची हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी याची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे रोझी म्हणाल्या.