अनंतनागमधून अपहरण झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला

दहशतवाद्यांनी दोन जवानांचे केले होते अपहरण

अनंतनागमधून अपहरण झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला

जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांनी दोन जवानांचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांनी दोन टेरिटोरिअल आर्मीच्या (टीए) सैनिकांचे अपहरण केले होते. यानंतर एक जवान त्यांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या जवानाचा शोध घेतला जात होता. अशातच आता दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर भारतीय लष्कराचा एक जवान मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या १६१ युनिटशी संबंधित दोन जवानांचे अनंतनागमधील जंगल परिसरातून अपहरण करण्यात आले होते. दोन गोळ्या लागल्यानंतर यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. जखमी सैनिकाला आवश्यक उपचारांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधेत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

यानंतर, अपहृत जवान हिलाल अहमद भट याचा गोळ्या झाडलेला मृतदेह बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी अनंतनागच्या पाथरीबल जंगल परिसरात सापडला. जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका दिवसानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

हे ही वाचा..

घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर बोपदेव घाट परिसर पाहणीचा देखावा कशासाठी?

स्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई

ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल

हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर ठार

“गुप्तचर माहितीच्या आधारे, ८ ऑक्टोबर रोजी कोकरनागमधील काझवान जंगलात जम्मू- काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सीसह भारतीय लष्कराने संयुक्त दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. प्रादेशिक लष्कराचा एक सैनिक बेपत्ता झाल्याची माहिती आहे,” भारतीय लष्कराच्या श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने याची माहिती दिली आहे.

Exit mobile version