बॉडी बिल्डर संकल्प भाटकरला आईच्या हत्येप्रकरणी अटक

संकल्प भाटकरकडून आई वडिलांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला

बॉडी बिल्डर संकल्प भाटकरला आईच्या हत्येप्रकरणी अटक

बॉडी बिल्डर संकल्प भाटकर याने आई वडिलांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ठाण्यातील घोडबंदर रोड येथे घडली. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या संकल्पला कासारवडवली पोलिसांनी कुर्ला नेहरू नगर येथून अटक केली आहे.

विनिता भाटकर (६६) आणि विलास भाटकर (७१) असे हल्ला करण्यात आलेल्या आई वडिलांची नावे आहेत. विलास भाटकर हे पत्नी सोबत मोठा मुलगा सौरभ (३९) यांच्यासोबत ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कोरल हाईट्स या इमारतीत वास्तव्यास आहेत आणि लहान मुलगा संकल्प (३१) हा ठाणे पूर्व कोपरी येथील अष्टविनायक चौक येथे एका इमारतीत राहत होता. बॉडी बिल्डिंग करणारा संकल्प याने मुंबई, ठाणे सह राज्यातील अनेक जिल्ह्यात शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून पारितोषिके मिळवली आहेत.

संकल्प याचे आठवड्याभरापूर्वी आई वडिलांसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवून गुरुवारी सकाळी ११ वाजता संकल्प हा घोडबंदर रोड, कोरल हाईट्स या इमारतीत भावाकडे आला होता आणि त्याने आठवड्याभरापूर्वी झालेले भांडण उकरून काढले. शिवाय  सोबत आणलेल्या तीक्ष्ण हत्याराने आई वडिलांवर सपासप वार करत सुटला, आई वडील रक्ताच्या थारोळ्यात पडताच संकल्प हा भानावर आला आणि त्याने तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी तातडीने विनिता आणि विलास या दाम्पत्याना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी विनिता यांना तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या विलास यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संकल्प याच्या विरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेऊन कुर्ला पूर्व येथून त्याला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, हे न्यायालयाचे मत महत्त्वाचे!

गद्दारांच्या मागणीचा मी का विचार करू म्हणून दिला राजीनामा!

‘मिशन थर्टी डेज’ साडेसात कोटीचे ड्रग्स जप्त; ३५० जणांना अटक

पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर

संकल्प भाटकर हा स्टेरॅाईडचे अतिसेवन करायचा स्टेरॅाईडच्या अतिसेवनामुळे तो शीघ्रकोपी बनला होता, त्याला कोणी काही बोलले तरी त्याला राग पटकन येत असे आणि तो हिंसक होत असे अशी माहिती तो राहत असलेल्या परिसरातील स्थानिकांनी दिली.

Exit mobile version