माहीमची ती अनधिकृत मजार अर्ध्या तासात हटविली

राज ठाकरे यांनी सभेदरम्यान दाखविलेल्या व्हीडिओनंतर केली गेली कारवाई

माहीमची ती अनधिकृत मजार अर्ध्या तासात हटविली

माहीम येथे समुद्रात करण्यात आलेले मजारीचे अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने अर्ध्या तासात ही मजार हटविली.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर केलेल्या भाषणात या मजारीची व्हीडिओ क्लिप दाखविली होती. समुद्रात अशी मजार कशी काय उभी राहिली अशी विचारणा करताना एका महिन्यात ती हटविण्यात आली नाही तर आपण त्याच्या शेजारी गणपती मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

त्यानंतर लगेचच सगळ्या हालचाली सुरू झाल्या. पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी रात्री केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी ती हटविण्याचे तातडीने आदेश दिले. त्याप्रमाणे सकाळी ८ वाजताच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस असा मोठा ताफा माहीमच्या त्या मजारीपाशी पोहोचले.

अर्ध्या तासातच हा सगळा परिसर अनधिकृत बांधकाम मुक्त करण्यात आला. या परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

हे ही वाचा:

आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये

मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून राहुल गांधीना दोन वर्षांचा कारावास, जामीनही मिळाला

राज ठाकरेंनी दाखवलेल्या अनधिकृत ‘दुसरी हाजीअली’वर पडणार हातोडा

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

राज ठाकरे यांनी जी व्हीडिओ क्लिप दाखवली त्यात ड्रोनच्या सहाय्याने हा सगळा परिसर दाखविण्यात आला. त्यात समुद्रातील एक जागा माती दगडांनी बुजवून त्यावर एक मजार दिसते. हिरवे झेंडे लावण्यात आल्याचे दिसते आणि लोक समुद्राच्या उथळ पाण्यातून चालत त्या मजारीपाशी येऊन दर्शन घेतात.

राज ठाकरे यांनी हे सगळे पोलिस, पालिका प्रशासन यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे झाले अशी टिप्पणी केली. शिवाय, सर्वसामान्य जनतेलाही सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आजूबाजूला काय होते आहे याचे भान बाळगा असे राज ठाकरे म्हणाले.

६०० वर्षांचा इतिहास असल्याचा दावा

यासंदर्भात मगदूम शाह बाबा दर्गाचे विश्वस्त सोहेल खंडवानी म्हणाले की, ही बैठक असून ६०० वर्षे जुनी आहे. तिथे कबर नाही. वक्फ बोर्डाकडेही ती नोंदणीकृत आहे. त्याच्या आजूबाजूला जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते हटवा.

Exit mobile version