मुंबई महानगर पालिकेत नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका टोळीची पोलखोल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. या टोळीमध्ये खुद्द मुंबईत महानगर पालिकेच्या महिला अधिकारी आणि तिच्या पतीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईत गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या महिला अधिकाऱ्यासह चार जणांना बेड्या घातल्या आहेत.
प्रांजली भोसले, लक्ष्मण अनंत भोसले, राजेश अनंत भोसले आणि महेंद्र बळीराम भोसले असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे. प्रांजळी भोसले ही महापालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तसेच लक्ष्मण भोसले हा पती असून राजेश आणि महेंद्र हे दोघे नातलग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात या टोळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
हे ही वाचा:
अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र
मुंबईत ज्वेलर्स दुकानावर खुनी दरोडा; मालकाची हत्या
रवि शंकर प्रकरणात केंद्राची ट्वीटरला चपराक
पित्याने तीन मुलांना आईस्क्रीम मधून दिले विष; एकाचा मृत्यू
अनेक बेरोजगार तरुणांना महानगर पालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये या टोळीने उकळले होते. या प्रकरणी नवघर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी समांतर तपास सुरू केला असता टोळीतील मुख्य आरोपी प्रांजली भोसले असल्याचे उघडकीस आले.
प्रांजली भोसले ही मनपाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिने तिचा पती आणि इतर दोन नातलगांच्या मदतीने बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. गेल्या वर्षांपासून कामावर गैरहजर असणाऱ्या प्रांजली भोसले हीचा पोलिसांकडून शोध सुरु केला असता ती पतीसोबत गोवा येथे मौजमजा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार व त्यांच्या पथकाने गोवा पोलिसांच्या मदतीने प्रांजली व तिचा पती लक्ष्मण भोसले यांना ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत राजेश आणि महेंद्र यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांना ठाणे आणि कल्याण येथून पोलिसांनी अटक केली. या टोळीने सुमारे २ कोटी २७ लाख रुपयाचा गंडा बेरोजगार तरुणांना घातला असून फसवणुकीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता असल्याची पोलिसांनी सांगितले.