राज्यात कोविडच्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर औषध उपलब्ध होत नसताना राज्याच्या निरनिराळ्या भागात रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार आणि काही ठिकाणी रेमडेसिवीर औषधाच्या इंजेक्शनमधून चक्क पाणी विकलं गेल्याच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. या विविध प्रकरणांत विविध ठिकाणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये चक्क पाणी घालून विकले जात असल्याची घटना उघड झाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून या विक्रेत्यास अटक केली. रईस अफजल शेख असे या आरोपीचे नाव असल्याचे कळले आहे.
हे ही वाचा:
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती
महापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का?
संध्या दोशींवर गुन्हा दाखल करा! भाजपाची मागणी
सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर
दुसरीकडे कोल्हापूर आणि औरंगाबाद या शहरांत रेमडेसिवीरचा काळाबाजार चालू असल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूरात रेमडेसिवीरची काळ्या बाजारात १८ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. योगिराज वाघमारे व पराग पाटील अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल ११ रेमडेसिवीर इंजेक्शने जप्त करण्यात आली.
औरंगाबादमध्ये देखील अशा प्रकारची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात अभिजित नामदेव तौर, मंदार अनंत भालेराव, अनिल ओमप्रकाश बोहते आणि दिपक सुभाषराव ढाकणे यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे.
अशाच प्रकारची घटना नागपूरात देखील घडली. नागपूरमध्ये एका वॉर्डबॉयनेच रेमडेसिवीरची इंजेक्शने चोरली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.