भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

महेश गायकवाड, राहुल पाटील जखमी

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील हिललाइन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिसांच्या केबिनमध्ये दोन राजकीय नेते आणि समर्थक दीर्घकाळापासून चालत आलेल्या जमिनीच्या वादासंदर्भात तक्रार करण्यासाठी जमले असताना शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी सुरू असताना संतापाच्या भरात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत शिवसेनेचे आमदार राहुल पाटीलही जखमी झाले आहेत. दोन्ही नेत्यांवर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी गोळीबारासाठी वापरलेली बंदूकही जप्त करण्यात आली आहे. शिवसेना समर्थक ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरात जमले असून शहरात तणावाची परिस्थिती आहे.

गणपत गायकवाड यांनी या प्रकरणी न्यायालय जो निर्णय देईल, तो आपल्याला मान्य असेल, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात गुन्हे वाढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी भाजपचा विश्वासघात केल्याचा दावाही त्यांनी केला.

‘एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला आणि आता ते भाजपसोबतही हेच करू पाहात आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझ्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे, असाही आरोप त्यांनी केला. तरीही त्यांनी आपण गुन्हेगार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्व नागरिक मला चांगलेच ओळखतात, त्यामुळे त्यांचा विश्वास माझ्यावर कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

दिवाळखोर पाकिस्तान आता मालदीवला मदत करणार!

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!

महेश गायकवाड यांना सुरुवातीला उल्हासनगरमधील मिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आले.

Exit mobile version