बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये भाजपा नेत्याची हत्या झाल्याची घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पाटणा येथे भाजपा नेते मुन्ना शर्मा यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, आरोपींना मुन्ना शर्मा यांना लुटायचे होते, मात्र त्यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
भाजपा नेते मुन्ना शर्मा हे व्यवसायाने पुजारी होते. पाटणा शहरातील चौक पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. हल्लेखोर मुन्ना शर्मा यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मुन्ना शर्मा यांनी त्यांना विरोध केला. यानंतर चिडलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी शर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक
हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?
‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक
ममता सरकारवर नाराज खासदाराने दिला राजीनामा
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, रविवारी मुन्ना शर्मा यांच्या मुलाची सगाई झाली होती. सोमवारी सकाळी ते पाहुण्यांना आणि कुटुंबीयांना गाडीत बसवण्यासाठी म्हणून घराबाहेर आले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यात सोन्याची चैन होती. हल्लेखोर हे दबा धरून बसलेले होते आणि त्यांनी मुन्ना शर्मा यांना लक्ष्य केले. संधी साधताच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच आरोपींनी शर्मा यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर शर्मा यांना नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.