बिपरजॉयचा फटका बसला; मुंबईत जुहू बीचवर सहाजण बुडाले

दोन जणांना वाचविण्यात यश, चार जण बेपत्ता

बिपरजॉयचा फटका बसला; मुंबईत जुहू बीचवर सहाजण बुडाले

बिपरजॉय वादळामुळे सगळीकडे सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला असतानाही अनेक लोक उत्साहाच्या भरात समुद्रकिनाऱ्यांवर जाऊन पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत. त्यातून अघटित घडण्याचा धोका आहे. याच अतिउत्साहातून जुहू येथे सहा जण बुडाल्याची घटना घडली आहे. त्यातील दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर चार जण बेपत्ता आहेत, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.

जुहू समुद्रकिनाऱ्यावर समुद्रातील पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईच्या विविध भागातूनच नव्हे तर मुंबई पाहायला आलेले अनेक बाहेरच्या राज्यातील लोकही येत असतात. तिथे काही भागात लोकांनी पाण्यात जाऊ नये अशा सूचनाही लिहिलेल्या आहेत तरीही अतिउत्साही पर्यटक पाण्यात शिरतात. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यात हे सहा जण बुडाल्याचे समोर आले.

 

त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी पालिकेची सुरक्षा पथके, अँब्युलन्स यांनी तातडीने धाव घेत या सहाजणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन जणांना वाचविण्यात त्यांना यश आले. बिपरजॉय या वादळाचा कहर गेले काही दिवस पश्चिम किनाऱ्यावर पाहायला मिळतो आहे. त्यामुळे कुणीही समुद्रकिनाऱ्यांवर अतिउत्साह दाखवू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

बेंगळुरूत नफरत की दुकान? डच पर्यटकाचा हात मुरगाळून धाक दाखवला

गणपतीपुळ्याच्या समुद्राने ओढून घेतले मोबाईल, पैसे… किनारा पर्यटकांसाठी बंद

गेल्या १० वर्षांत भारताने जिंकले एकच आयसीसी अजिंक्यपद

बृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!

कोकणातही समुद्राच्या उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जुहू व मुंबईतील किनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन लोकांना करण्यात आलेले आहे. तरीही ही घटना घडली. एनडीआरएफने यासंदर्भात सांगितले होते की, आम्ही बिपरजॉय वादळाचा परिणाम लक्षात घेता मुंबईत आधीपासून असलेल्या तीन पथकांबरोबरच आणखी दोन पथके तैनात केलेली आहेत. चार पथकांना गुजरातला रवाना करण्यात आलेले आहे. पुण्यातही एक पथक आहे.पण सगळी तयारी असतानाही अतिउत्साहाचा हा फटका या सहा जणांना बसला आहे. आता चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात अद्याप जास्त माहिती मिळालेली नाही.

Exit mobile version