मणिपूरमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, म्यानमारमधून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बायोमेट्रिक्स गोळा केले जातील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. म्यानमार सीमेपलीकडून कुकी समाज बेकायदा स्थलांतरित झाल्याचा आरोप मैतेई समाजाने केला होता. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
म्यानमारमधून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा बायोमेट्रिक डेटा जमा केला जाईल, असे सरकारी सूत्रांनी गुरुवारी सांगितले. यामुळे सरकारला स्थलांतरितांची ओळख पटवण्यास मदत होईल. त्यांचा ‘नकारात्मक बायोमेट्रिक यादी’मध्ये समावेश केला जाईल, जेणेकरून ते नंतर भारताचे नागरिक होऊ शकत नाहीत. यासोबतच, भारत-म्यानमार सीमेवर कुंपण पूर्ण करण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत मणिपूर-मिझोराम सीमेवर १० किमी कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. ज्या एजन्सींनी प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यांना सीमेवर कुंपण घालण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
ठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप
ट्रेन ९० मिनिटे लवकर आली अन् पाच मिनिटांत सुटली, ४५ प्रवासी राहिले मागे
ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात पाठवतोय अमली पदार्थ
इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापकास अटक
मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान हे घडले आहे. कुकी हे म्यानमार सीमेपलीकडून बेकायदा स्थलांतरित झाले आणि मणिपूरमधील वनजमिनीवर कब्जा करत आहेत, असा आरोप मैतेई समुदायाने केला आहे. काही दिवसांपूर्वी, मणिपूर सरकारने सांगितले की, जुलैमध्ये म्यानमारमधून ७०० हून अधिक अवैध स्थलांतरितांनी राज्यात प्रवेश केला. नवीन स्थलांतरितांच्या घुसखोरीचे प्रकरण आंतरराष्ट्रीय परिणाम आणि राज्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिली आहे.
दुसरीकडे, कुकींनी असा युक्तिवाद केला आहे की बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा केवळ एक खेळी असून त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे आहेत.