ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यातील एका गावातून फरार आरोपीला अटक केली आहे,या आरोपी जवळून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.जप्त करण्यात आलेल्या शस्त्रासाठ्यात २०पिस्तुल, एक मशीनगन,२ मॅगझीन आणि२८०जिवंत काडतुसांचा समावेश आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट ५च्या पथकाने केली आहे.
सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (२७) असे शस्त्रासाठ्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुरजीतसिंग हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील उमर्टीगाव जिल्हा बडवानी येथे राहणारा आहे. सुरजीतसिंग याच्यावर वर्षभरापूर्वी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मिरात पाच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
४५ वर्षांनंतर यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली
उपनिषदांमध्येही नमूद आहे हवामान विभागाचे रहस्य
उद्धव ठाकरेंनी लोकांना वेळ दिला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव
या गुन्ह्यात सुरजीतसिंग हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना सुरजितसिंग हा धुळे जिल्ह्यातील एका गावात शस्त्रासाठयासह आला असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखा कक्ष ५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली या माहितीच्या आधारे युनिट ५चे पथक धुळे येथे रवाना झाले व खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून धुळे जिल्ह्यातील पलासनेस गावात छापा टाकून सुरजितसिंग याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली असता पोलीस पथकाला त्याच्याकडे २० गावठी स्टील च्या पिस्तुल, १गावठी मशीनगन, दोन मॅगझीन आणि २८० जिवंत काडतुसे मिळाली. सुरजितसिंग हा ही शस्त्रे मध्य प्रदेश येथून घेऊन आला होता व ही शस्त्रे धुळे मार्गे मुंबई ठाण्यात घेऊन येणार होता, अशी माहिती चौकशीत समोर आली.
सुरजितसिंग याला अटक करून मंगळवारी ठाण्यात आणण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा ठाण्यात आणि मुंबईत कुणाला देण्यात येणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे.