मुंबई कस्टम विभागाच्या कारवाईचा धडाका जोरदार सुरु आहे. मागील महिन्यांच्या काळात मुंबई कस्टम विभागाने मोठ-मोठ्या कारवाई करत ड्रग्ज, सोने, चांदी, हिऱ्यांची तस्करी करणाऱ्यांना अटक करत कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला होता. याच मालिकेत मुंबई कस्टम विभागाने शुक्रवारी-शनिवार (२०-२१ सप्टेंबरच्या) रात्री दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त केले. यामध्ये सोन्याची किंमत १.५८ कोटी रुपये आणि हिऱ्यांची किंमत १.५४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे. जप्त करण्यात आलेला माल प्रवाशांनी आपल्या शरीरावर, गुप्तांग ठिकाणी, शरीरावरील कपड्यांमध्ये विशेष असे छुपे कप्प्यांमध्ये ठेवले होते. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत, मुंबई कस्टम विभागाने दुबईहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला थांबवले आणि त्याची तपासणी करून तस्करीचा माल जप्त केला. त्याच्याकडून २४ कॅरेट सोन्याचे (एकूण वजन १४०० ग्रॅम) १२ बार सापडले. चौकशीदरम्यान प्रवाशाने सांगितले की, हे कृत्य त्याच फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून केले आहे. सहप्रवाशानेही आपल्या निवेदनात हे मान्य केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाला विमानतळावर थांबवून त्याच्याकडून तपासणी दरम्यान २४ कॅरेट सोन्याचे दोन कडे सापडले. तर प्रवाशाच्या बनियनच्या आत एक विशिष्ठ प्रकारचा छुपा खिसा तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये हिरे लपवले होते. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली, दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या मुंबई कस्टम विभाग करत आहे.
हे ही वाचा :
कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विजयांची संख्या आता जास्त, बांगलादेशला नमविले
पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?
पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!
पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान अमेरिकेकडून तस्करी झालेल्या २९७ मौल्यवान कलाकृती भारताला परत!