धुळ्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त!

शिरपूर पोलिसांची कारवाई

धुळ्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये कोट्यावधींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत तब्बल दोन कोटीच्या घरात आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (४ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास इंदूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अशोक लेलँड कंपनीच्या वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.पोलिसांना गुटखा तस्करीची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर सापळा रचण्यात आला. संबंधित वाहन आढळल्यावर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात जवळपास ८५ हजार पन्नास रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.वाहनाची किंमत तब्बल वीस लाख रुपये आहे. या कारवाईत २० लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

२००४ ची चूक पुन्हा नको; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना इशारा!

आमदार गणपत गायकवाड यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!

लडाखमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले!

मेरठमधून पाकिस्तानी आयएसआय एजंटला एटीएसकडून अटक!

तसेच गुजरात राज्यातून शहादा रस्त्याने शिरपूरकडे तीन वेगवेगळ्या माल ट्रकमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता, एका मालवाहू ट्रकमध्ये प्लास्टिक गोण्यांमध्ये भरलेला गुटखा आढळून आला, ज्याची किंमत १ कोटी ११ लाख २ हजार ७२० रुपये इतकी आहे.

तर दुसऱ्या ट्रकमध्ये ५९ लाख ६६ हजार तीनशे रुपये किमतीचा सुगंधित गुटखा आणि तिसऱ्या ट्रकमध्ये ६२ लाख ४५ हजार ९४४ रुपये किमतीचा गुटखा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये सुमारे २ कोटी ५४ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Exit mobile version