उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. यानंतर या संत्सगचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा फरार आहे. यानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता या सगळ्या प्रकरणावर भोलेबाबा उर्फ नारायण साकार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जे काही घडलं त्याचा मला खेद वाटतो आहे असं फरार असलेल्या भोले बाबांनी म्हटलं आहे.
भोले बाबा यांनी पात्र प्रसिद्ध करत म्हटलं आहे की, “मी चेंगराचेंगरी होण्याआधीच तिथून निघालो होतो. चेंगराचेंगरीत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांना मी आदरांजली वाहतो. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांना देव लवकर बरं करो अशी प्रार्थना करतो. या प्रकरणासाठी वरिष्ठ वकील डॉ. ए.पी. सिंह यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे. कारण काही समाजकंटकांमुळे चेंगराचेंगरी झाली,” असं भोले बाबांनी म्हटलं आहे.
भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरू होता. सत्संग समारंभाचा समारोप होत असताना एकाएकी गर्दीत गोंधळ निर्माण झाला आणि धक्काबुक्की झाली. हा समारंभ एका मोठ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. एकाएकी गोंधळ उडाल्यामुळे लोकांची धावपळ झाली आणि काही जणांनी बाहेर पडण्यासाठी एकमेकांना धक्का दिला. यात अनेक लोक जमिनीवर पडले. या पडलेल्या माणसांना उचलण्या ऐवजी लोकांनी त्यांच्या अंगावर पाय देऊन मार्ग काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांचा यात मृत्यू झाला.
हे ही वाचा:
चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अखेर टी- २० वर्ल्ड कपसह भारतीय संघ मायदेशी परतला
हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने
भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद
वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी
योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातलगांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान साहाय्यता निधीमधूनही मृतांच्या नातलगांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे.