हाथरसमधील सत्संग कार्यक्रमाचे आयोजक भोले बाबा चेंगराचेंगरीनंतर फरार

आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

हाथरसमधील सत्संग कार्यक्रमाचे आयोजक भोले बाबा चेंगराचेंगरीनंतर फरार

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. शिवाय मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, या संत्सगचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा फरार असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याची माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०५, ११०, १२६, १२६ (२), २२३ आणि २३८ अंतर्गत ‘मुख्य सेवेदार’ असलेले देवप्रकाश मधुकर आणि चेंगराचेंगरी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संत्सगचा आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा फरार असल्याची माहिती आहे.

“आम्हाला भोले बाबा कॅम्पसमध्ये सापडले नाहीत. ते येथे नाहीत,” असं पोलीस उपअधीक्षक सुनील कुमार यांनी सांगितले. दुपारी ३.३० च्या सुमारास भोले बाबा कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असतानाच चेंगराचेंगरी झाली होती. त्यांची गाडी बाहेर पडल्यानंतर त्या कारच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. परिणामी चेंगराचेंगरी होऊन ११६ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले.

भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरू होता. सत्संग समारंभाचा समारोप होत असताना एकाएकी गर्दीत गोंधळ निर्माण झाला आणि धक्काबुक्की झाली. हा समारंभ एका मोठ्या मैदानात आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. एकाएकी गोंधळ उडाल्यामुळे लोकांची धावपळ झाली आणि काही जणांनी बाहेर पडण्यासाठी एकमेकांना धक्का दिला. यात अनेक लोक जमिनीवर पडले. या पडलेल्या माणसांना उचलण्या ऐवजी लोकांनी त्यांच्या अंगावर पाय देऊन मार्ग काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांचा यात मृत्यू झाला.

हे ही वाचा:

नापास झालेली काँग्रेस भाजपा पराभूत झाल्याचे चित्र रंगवतेय

“पूर्वी बेशरमपणे मान्य केलं जायचं की, १ रुपयात ८५ पैशांचा घोटाळा होतोय”

उत्तर प्रदेशात सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांचा मृत्यू

धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल

अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असण्याची शक्यता सिंकंदररावचे पोलीस प्रमुख आशिष कुमार यांनी वर्तविली आहे. योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातलगांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान साहाय्यता निधीमधूनही मृतांच्या नातलगांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version