घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला एगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा तर मुंबई महानगर पालिका कायदा अंतर्गत २१ गुन्हे दाखल आहेत. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर भिंडे हा कुटूंबासह फरार झाला असून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
घाटकोपर पूर्व येथे सोमवारी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत १४ जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिंग कंपनी एगो मीडियाचे मालक, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासह सिव्हिल कंत्राटदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंडे याचा शोध घेण्यासाठी पंतनगर पोलिसांचे दोन पथके तयार करण्यात आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भावेश भिंडे याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात भिंडे ला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान २००९ मध्ये भिंडे यांनी मुलुंड येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
हे ही वाचा:
दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!
लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी
‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम’वर आणखी पाच वर्षांसाठी बंदी
भिंडे यांनी निवडणूक आयुक्त यांना दिलेल्या जाहीरनाम्यात त्यांच्यावर दाखल आलेल्या गुन्ह्ययांचा उल्लेख केला आहे.त्यात त्यांनी २१ गुन्ह्याचा उल्लेख केला आहे. ज्या मध्ये परवानगीशिवाय बॅनर लावल्याबद्दल आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स संबंधित दोन गुन्हे मुंबई महानगरपालिका कायद्यांतर्गत दंड ठोठावण्यात आला होता. भिडे यांनी २१ वेळा एमएमसी कायद्याच्या कलम ३२८ (परवानगीशिवाय होर्डिंग लावणे) आणि ४७१ (दंड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे घोषित केले आणि दोन वेळा त्यांना शिक्षा झाली.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भिंडे याला भगोडा घोषित करून त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.