कुर्ला बस अपघातातील चालकाला मिळाले होते एक दिवसाचे प्रशिक्षण? २५ जणांचे नोंदवले जबाब

पोलिसांच्या तपासाला वेग

कुर्ला बस अपघातातील चालकाला मिळाले होते एक दिवसाचे प्रशिक्षण? २५ जणांचे नोंदवले जबाब

कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बस अपघाताच्या तपासाला वेग आला आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या कुर्ला पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही फुटेज वरून बस मधील प्रत्यक्षदर्शीचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान पोलिसांनी प्रवासी, प्रत्यक्षदर्शी, जखमी पीडित, बेस्टचे कर्मचारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसह आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी जबाब घेतले जातील, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण कशामुळे सुटले हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी चालक संजय मोरे याला १ डिसेंबरपासून बेस्टच्या बसेस चालवण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कामावर घेण्यात आले होते. बसेस बेस्टने कंत्राटी असून खासगी कंपनीद्वारे चालवल्या जातात. सूत्रांनी सांगितले की, मोरे यांना बेस्टच्या बस चालवण्याचे फक्त एक दिवसाचे प्रशिक्षण मिळाले होते. अपघाताच्या दिवशी मोरे कुर्ला-अंधेरी मार्गावर बस क्रमांक ३३२ चालवत होते. प्राणघातक घटना घडण्यापूर्वी त्याने या मार्गावर तीन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. मोरे यांनी १ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान कोणत्या बसेस चालवल्या याचाही तपास पोलिस करत आहेत.

हे ही वाचा:

जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल!

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये तफावत नाहीच

अधिक चौकशीसाठी मोरे यांना ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी बसवरील ताबा सुटल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. घटनेपूर्वी दरम्यान मोरेची मानसिक स्थिती कशी होती, याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी त्याच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवू शकतात.

बसची स्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी ती आरटीओ तपासणीसाठी पाठवली आहे. अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे, आणि अपघातास वाहनाची स्थिती कारणीभूत आहे की नाही यावर प्रकाश टाकण्यात येईल. या दु:खद घटनेने आउटसोर्स बस ऑपरेशन्सच्या सुरक्षा प्रोटोकॉल आणि चालक प्रशिक्षणाच्या पर्याप्ततेबद्दल गंभीर चिंता निर्माण केली आहे. तपास सुरूच आहे.

Exit mobile version