बाटला हाऊस एन्काऊंटर केस प्रकरणात आरिज खानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने ही केस रेयरेस्ट ऑफ रेयर असल्याचे म्हटले आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने ८ मार्च रोजी आरिज खानला दोषी ठरवले होते. राजधानी दिल्लीमध्ये २००८ साली झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटर केस नंतर आरिज खान फरार झाला होता. त्याला २०१८ मध्ये नेपाळमधून अटक करण्यात आली होती.
Delhi Court awards death penalty to convict Ariz Khan in 2008 Batla House encounter case.
The court calls the case as 'rarest of rare case'
— ANI (@ANI) March 15, 2021
बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात पोलीस अधिकारी मोहन चंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. तर पोलीस कर्मचारी बलवंत सिंह राजवीरच्या हत्येचाही प्रयत्न झाला होता. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात यापूर्वी आरोपी शहजाद अहमदला २०१३ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती. तर त्याचे दोन साथीदार आतिफ आमीन आणि मोहम्मद साजिद मारले गेले होते.
हे ही वाचा:
आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?
इनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?
इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खानला साकेत कोर्टाने दोषी ठरवले होते. १५ मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार असल्याचेही कोर्टाने जाहीर केले होते. आरिज खानला कलम ३०२,३०७ आणि आर्म्स ऍक्टनुसार दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२००८ मधील दिल्ली-जयपूर-अहमदाबाद आणि यूपीतील न्यायालयात जे बॉम्बस्फोट झाले होते, त्यातील मुख्य सूत्रधारांमध्ये आरिज खानचं नाव होतं. या बॉम्बस्फोटानंतर आरिज खानची माहिती देणाऱ्यास तब्बल १५ लाख रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं होतं. तसंच त्याच्याविरोधात इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर करण्यात आली होती. मूळचा आझमगढचा रहिवासी असलेला आरिज खान उर्फ जुनैदला स्पेशल सेलच्या टीमने फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक केली होती.