बंदूक रोखून जालन्यात लुटली बँक

बंदूक रोखून जालन्यात लुटली बँक

पुण्यातील बँकेवरील दरोड्याची घटना ताजी असताना आता जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बँकेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. ही घटना गुरुवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी घडली.

तीन अज्ञात व्यक्ती बंदूकसह बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत २५ लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तीन आरोपी तोंडाला रुमाल बांधून बँकेत शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक रोखली आणि त्यानंतर त्यांनी २५ लाखांची रोकड लंपास केली. यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. त्यांनी किती किमतीचे दागिने पळवले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पटिलमध्ये

झुक्याने केले फेसबुकचे नव्याने बारसे

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर

पाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या

दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केली होती. काही खातेदारांच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी चोरुन नेल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

गेल्या आठवड्यात पुण्यात चार ते पाच चोरांनी महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे दोन महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. त्या दरोड्यात तर बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही बँकेमध्ये सुरक्षा वाढवली जाताना दिसत नाहीय. याशिवाय पुण्यातील घटनेनंतर जालन्यात अशी घटना अवघ्या आठ दिवसात समोर आली आहे.

Exit mobile version