राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. भाजपा महिला पदाधिकाऱ्याने आव्हाडांविरोधात विनयभंग केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ठाणे न्यायालयाकडून अटी शर्थींसह आणि १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सरकरी वकील वर्षा चंदने यांनी जोरदार युक्तिवाद करत आव्हाडांच्या जामिनाला विरोध केला. तर आव्हाड यांच्या वतीने गजानन चव्हाण यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात लॅपटॉप आणला होता. ज्यावर न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय दिला आहे.
रविवार, १३ नोव्हेंबर रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान भाजपा महिला पदाधिकाऱ्याने आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. पुढे मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात विनयभंग केल्याची तक्रार करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीवरून पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे
हे ही वाचा :
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे
म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर!
जलतरणपटू स्वप्नील,अविनाशला ‘अर्जुन’ आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक लाड यांना ‘द्रोणाचार्य’
हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती
विवियाना मॉल मारहाण प्रकरणीसुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आव्हाडांना अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना १५ हजार जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. विनयभंग प्रकरणी सुद्धा आव्हाडांवर काल गुन्हा दाखल झाला आणि आजच्या सुनावणीत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.