पोलीस सेवेत साहसाचा परिचय देणाऱ्या महाराष्ट्रातील तीन पोलीसांना गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार आणि किर्ती चक्र प्रदान करण्यात आले. आयपीएस सोमय मुंडे, पोलीस नाईक टीकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम अशी या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. यात जवळपास २६ नक्षलवादी ठार करण्यात आले होते. सी-६० कमांडोची टीम नक्षलविरोधी कोटगूल परिसरातील मरभिनटोला गावाजवळच्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना तिथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला होता.
पोलिसांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यात शौर्य गाजविणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अन्य कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.
हे ही वाचा:
राहुल गांधी दिल्ली विद्यापीठात घुसले, पाठवली जाणार नोटीस
राज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !
डिझेलच्या गाड्या बंद करायच्या आहेत, पण तूर्तास नाही!
सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे
या गोळीबारात २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते, तर आपले चार पोलिस जवान जखमी झाले होते. ही कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली होती. विशेष म्हणजे या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ श्रेणीतील चार मोठे नक्षल नेते ठार करण्यात आले होते. यात मिलिंद तेलतुंबडे व विजय रेड्डी, जोगन्ना तसेच संदीप दीपकराव यांचा समावेश होता. केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील तीन पोलीसांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रपतींच्या हस्ते याप्रसंगी शौर्य पुरस्कार आणि कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुरस्कार प्राप्त पोलिसांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा गडचिरोलीत असताना २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.या बहादुर पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
कोण आहेत IPS सोमय मुंडे ?
सोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत. ३१ वर्षे वयाच्या सोमय विनायक मुंडे यांचं लहानपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. सोमय मुंडे यांचे शिक्षण एमटेक, आयआयटीमध्ये झालेय. सोमय मुंडे यांचे शालेय शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी झालंय. सोमय यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केलेली असून, सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची २०१६ ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी झालेत.