औरंगाबाद इथल्या पैठण तालुक्यामधील चित्तेगाव येथे औरंगाबाद स्त्री रोग रुग्णालयात बेकायदा गर्भपात केंद्र चालविले जात असल्याचे समोर आले आहे. एका २२ वर्षीय विवाहितेची गर्भपात शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडल्यानंतर तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर रुग्णालय चालवणारे डॉक्टर जाधव दाम्पत्य फरार झाले आहेत.चित्तेगाव येथील या विवाहितेला आधी दोन मुली आहेत तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिली होती, आता मुलगाच हवा या अमिषापोटी त्यांनी लिंगनिदान करून घेतले. पण तिसऱ्यांदा मुलगीच होणार या भीतीपोटी त्यांनी गर्भपात करण्याचे ठरवले.
चित्तेगाव इथल्या पांगरी रोडवर असलेल्या औरंगाबाद स्त्री रुग्णालयात डॉक्टर जाधव पतिपत्नींकडून या महिलेने गर्भपात शस्त्रक्रिया करून घेतली , पण शस्त्रक्रियेनंतर तिला मोठ्या प्रमाणांत रक्तस्त्राव सुरु झाल्याने तिची प्रकृती खूपच खालावली. त्यानंतर तिला दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.ही महिला बुलढाणा जिल्ह्यातील असून घाटी रुग्णालयात तिला भरती करण्यात आले. त्यावेळी तिचा गर्भ बाहेर आल्याचे आणि गर्भपिशवी फाटल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करत महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर घाटी रुग्णालयातील डॉक्टरांकडून या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाने चित्तेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णालयावर छापा टाकला.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
पोलिसांनी रुग्णालयावर छापा टाकला त्यावेळेस त्यांना गर्भपात करण्याचे साहित्य सापडले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरु होता. याशिवाय सरकारने बंदी घातलेली बरीच औषधेही सापडली आहेत. या झाडाझडतीत पोलिस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल दोन तास लागले. आरोग्य विभागाने पोलिसांनी या जाधव दाम्पत्यांच्या रग्णालयांवर छापा मारला तेव्हा हे दाम्पत्य फरार असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस डॉक्टर जाधव दाम्पत्याचा शोध घेत आहेत.