डीआरडीओच्या ‘त्या’ शास्त्रज्ञाने हनी ट्रॅपमध्ये पैशाचा व्यवहार केला होता का?

शास्त्रज्ञाच्या हेरगिरीचा आर्थिक बाजूनेही तपास

डीआरडीओच्या ‘त्या’ शास्त्रज्ञाने हनी ट्रॅपमध्ये पैशाचा व्यवहार केला होता का?

पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण विभागामधील ज्येष्ठ शास्त्रज्ञाला बुधवारी अटक करण्यात आली. आता या शास्त्रज्ञाने गोपनीय माहितीच्या बदल्यात काही आर्थिक गैरव्यवहारही केला आहे का, याचा तपासही केला जात आहे.

‘डीआरडीओ’च्या दक्षता युनिटने शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. या युनिटकडून अंतर्गत तपास अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणातील सर्व बाजूंचा अभ्यास करून आम्ही आमच्या वतीने तपासाला सुरुवात करू,’ अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.

या तपासणीत प्रक्रियेमध्ये अटक करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाच्या बँक खात्यांची पडताळणीही केली जाणार आहे. ‘या शास्त्रज्ञाने काही माहिती पुरवली होती, असे डीआरडीओच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र ती माहिती गोपनीय होती की, खुली होती, हे तपासावे लागेल. शास्त्रज्ञाकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून आल्यानंतरच आम्ही याबाबत ठोस सांगू शकू,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले. एटीएसने दोन फोन, एक लॅपटॉप आणि इतर उपकरणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे सादर केली आहेत. या उपकरणांमध्ये पाकिस्तानी हस्तकांना पाठवलेली छायाचित्रे, फाइल्स किंवा इतर माहिती असल्याचे समजते.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने शास्त्रज्ञाच्या पुरवलेल्या माहितीच्या बदल्यात किंवा ब्लॅकमेल करण्याच्या कटाचा भाग म्हणून त्याच्या खात्यात पैसे जमा केले होते का? याचाही तपास केला जाणार आहे. आतापर्यंत हस्तगत केलेल्या पुराव्यांच्या विचार केल्यास पोलिस ही शक्यता नाकारत नाहीत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनी-ट्रॅप करून व पैसे हस्तांतरित करून शास्त्रज्ञाला असहाय्य वाटेल, अशा टप्प्यावर अडकवते. तसेच, अशी परिस्थिती निर्माण करून त्याला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले असावे, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय सशस्त्र दलांनी सुरू केलेले किंवा अंतिम टप्प्यात असलेल्या प्रकल्पांशी संबंधित माहिती या शास्त्रज्ञाने पुरवल्याचे अहवालामधून दिसत असल्याचे अधिकारी सांगतात. हे शास्त्रज्ञ ऑक्टोबर २०२२ पासून पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात होते. तसेच, त्यांनी गेल्या काही काळापासून फोनवरून शेअर केलेल्या काही फाइल्स आणि छायाचित्रे डिलिट केल्याचेही समजते.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

उद्धव ठाकरेंनी बारसूची जबाबदारी ढकलली फुटीर आमदारांवर

यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !

कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या मेगा रोड शोमध्ये बजरंग बलीचा नारा

न्यायवैद्यक तज्ज्ञ ही डीलिट केलेली माहिती परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतरच या शास्त्रज्ञाने नेमकी कोणती आणि किती संवेदनशील माहिती पुरवली आहे, हे कळू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे शास्त्रज्ञ पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथे पाकिस्तानी व्यक्तीची भेट घेतल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version