नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दोन दिवसात ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेवरून राजकारण देखील पेटलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, या संतप्त घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला. यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ४८ तासात ३१ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर मंगळवारी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. यावेळी पाहणी करताना त्यांच्या सोबत रुग्णालयाचे डीन (अधिष्ठाता) हे देखील उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी रुग्णालयात अस्वच्छता पाहून डीन यांना स्वतः स्वच्छतागृह साफ करायला लावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
देवरिया नरसंहारातील आरोपींविरोधात बुलडोझर कारवाईची तयारी
आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!
बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी
नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. नांदेडमधील घटनेवर राज्याच्या मंत्रिमंडळातही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी देखील या घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.