गेले काही दिवस ज्या लहानग्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू होती, त्या स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू याचे अपहरण झाल्याच्या बातमीने सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती. पण आता तो सापडला आहे. १० दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. सोशल मीडियावर त्याचे अपहरण झाल्याची माहिती व्हायरल झाली होती. त्यामुळे स्वर्णवचे कुटुंबीय प्रचंड चिंतेच होते पण अखेर १० दिवसांनी तो घरी परतला आहे. तो सुखरूप आहे.
पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट पाठशाळा परिसरातून तो गायब झाला होता. चार वर्षीय स्वर्णवचे अपहरण झाल्याचा संशय होता. सीसीटीव्हीतही त्याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी कसून शोध सुरू केला होता. १० दिवस हा तपास सुरू होता. त्याचे वडील सतीश चव्हाण यांनी अपहरणकर्त्यांना विनवण्या केल्या, हवे तितके पैसे घ्या पण आपल्या मुलाला सोडा, असे आर्जव त्याचे वडील करत होते.
स्वर्णवला ताप आला असेल तर त्याला सिरप द्या, अशी विनंतीही त्याचे वडील सोशल मीडिया व मुख्य मीडियातून करत होते. स्वर्णवसाठी औषध घ्यायला येणाऱ्यांवर लक्ष ठेवा असे आवाहन स्वर्णवच्या वडिलांनी केमिस्ट दुकानदारांना केले होते.
या अपहरणासंदर्भात काही फोटोही जारी करण्यात आले होते. त्यात दुचाकीवरून स्वर्णवला नेतानाचा व्हिडिओही होता. त्याचे फोटोही प्रसारमाध्यमात प्रसिद्ध करण्यात आले होते. काळ्या रंगाच्या ऍक्टिव्हा स्कूटरवर बसून स्वर्णवला पळवून नेणारा अपहरणकर्ता त्या फोटोत दिसत होता. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनीही यासंदर्भात पुढाकार घेऊन अपहरण कर्त्यांची माहिती मिळाल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे कळविले होते.
हे ही वाचा:
लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर
जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…
गोव्यात काँग्रेसला महाविकास आघाडी झेपली नाही!
आता गेले १० दिवस स्वर्णव कुठे होता, त्याच्यासोबत कोण होते, त्यांनी या १० दिवसांत काय केले, स्वर्णवला काही त्रास झाला का, याविषयी अद्याप माहिती हाती आलेली नाही. पण आता तो सापडल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ते खूप आनंदी आहेत