उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी अतीक अहमदचा मुलगा आणि या हत्याकांडात सहभागी असलेला असद याला एन्काऊंटर करून गुरुवारी मारण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्यासोबत त्याचा साथीदार गुलाम यालाही एन्काऊंटर करण्यात आले.
अतीक अहमदच्या कुटुंबातील तसेच त्याच्या गँगमधील गुंडांवर इनाम लावण्यात आले होते. त्यातील असदने उमेश पाल हत्याकांडात मुख्य भूमिका बजावली होती. त्यांच्या मागावर पोलिस होते. ५ लाखांचे इनामही त्यांच्यावर लावण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात असद आणि गुलाम मारले गेले. उत्तर प्रदेश टास्क फोर्सचे प्रमुख पोलिस उपअधीक्षक नवेंदू आणि विमल यांनी या दोघांना शरण येण्यास सांगितले. पण त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. यात पोलिसांना मात्र कोणतीही इजा झालेली नाही.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात
गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवर युएपीए अंतर्गत कारवाई
ढलती का नाम महाविकास आघाडी मन्नू तेरा हुवा, अब मेरा क्या होगा?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’
परदेशी शस्त्रास्त्रे सापडली
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ यश यांनी हे एन्काऊंटर झाल्याचे स्पष्ट केले. या दोघांकडे विदेशी शस्त्रे सापडल्याचेही अमिताभ यांनी सांगितले.
अमिताभ यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून या दोघांना पकडण्यासाठी पोलिस मागावर होते. पण ते काही दिवसांपूर्वी पोलिसांना चकवा देऊन पळाले होते.
अतीक अहमदचा तो तिसरा मुलगा होता. अतीक अहमद सध्या प्रयागराज तुरुंगात असून तेथे न्यायालयात उमेश पाल प्रकरणात सुनावणी सुरू आहे. अतीकव्यतिरिक्त त्याचा भाऊ अशरफ यालाही न्यायालयात आणले गेले आहे. अतीक अहमदने सध्या उत्तर प्रदेश सरकारपुढे गुडघे टेकले असून माझा परिवार उद्ध्वस्त झाल्याचे सांगत त्याने कुटुंबाला सोडून देण्यासाठी सरकारकडे पदर पसरला आहे. मात्र त्याच्या कुटुंबातील जवळपास सगळेच सध्या फरार आहेत.
यासंदर्भात उमेश पालच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. जे काही झाले आहे ते चांगलेच झाले आहे. न्याय मिळाला आहे. उमेश पालची आई म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्याला न्याय दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे.