उत्तर प्रदेशमधील माजी खासदार आणि गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली. गुन्हेगारी विश्वदेखील हादरून गेले आहे.
पोलिसांच्या गराड्यात आणि मीडियाशी बोलता बोलता या दोघांवर तीन इसमांनी हल्ला केला आणि त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला. त्यात हे दोघेही मृत झाले आहेत. नुकतीच अतिकचा मुलगा असद याचे एन्काऊंटर झाले होते. त्याची चर्चा देशभरात सुरू असताना अतिक आणि अशरफ यांची हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात बेफिकीरी दाखविल्याबद्दल या दोघांसोबत असलेल्या १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
जय श्रीरामच्या घोषणा देत या तिघांनी हे कृत्य केले. सनी, लवलेश आणि अरुण अशी या मारेकऱ्यांची नावे आहेत. उमेश पाल हत्याकांडात अतिक अहमद आरोपी होता. या दोघांनाही मेडिकलसाठी नेण्यात येत होते तेव्हाच ते चालता चालता मीडियाशी संवाद साधत होते. त्याचवेळी तीन जण आले आणि त्यांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या.
हे ही वाचा:
अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ४४ मालमत्तांना मुंबई अग्निशमन दलाने बजावल्या नोटीस
काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची…
पाकिस्तानी ड्रोनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला, २१ कोटींचे हेरॉईन जप्त
मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, गोरेगावचे झांज पथकही होते
अतिकचा मुलगा असद याने उमेश पाल हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. मात्र तो फरार होता. त्याच्यावर इनामही लावण्यात आले होते. त्याचवेळी झाशी येथे त्याचे एन्काऊंटर झाले. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच अतिक आणि अशरफ यांना मारण्यात आले. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तणावपूर्ण झाले असून संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेतली जात आहे. प्रयागराज येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या तिन्ही मारेकऱ्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या सगळ्या घटनेदरम्यान एएनआयच्या वार्ताहरालाही दुखापत झाली आहे. हवालदार मान सिंग यांनाही गोळी लागली आहे. प्रयागराज येथे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. या दोघांना नियमित वैद्यकीय तपासणीकरता आणले जात होते तेव्हाच ही घटना घडल्याचे प्रयागराजचे पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले आहे.