अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

चौकशीत हत्येमागील सत्य बाहेर येण्याची शक्यता

अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ हत्याकांडातील तीन आरोपींची पोलिस कोठडी प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयाने मंजूर केली आहे. लवलेश, अरुण आणि सनी या तिन्ही आरोपींना प्रतापगड तुरुंगातून प्रयागराजला आणून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीने ७ दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने केवळ ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येतील तिन्ही आरोपींची पोलीस आता चौकशी करणार आहेत. तपासात या खून प्रकरणाचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून या हत्याकांडात कोणाचा हात आहे, त्यांचा हेतू काय होतायाचे सत्य समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस कोठडीतील चौकशीमध्ये आरोपींकडे हत्येसाठी हत्यारे कोठून मिळाली, ती कोणी दिली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच ही हत्या का करण्यात आली याचाही तपास करण्यात येणार आहे. या तिन्ही आरोपींना २३ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तिकच्या मारेकऱ्यांना हजर करण्यासाठी कोर्टात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी न्यायालयाच्या सम्पूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहिल्या दोन स्तरात ईत्तर प्रदेश पोलिस तैनात होते तर आरएएफला अंतर्गत क्षेत्रात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेचे कोर्टात रेकॉर्डिंग करण्यात आले. सुनावणीनंतर तिन्ही आरोपींना राखीव पोलिस लाईनमध्ये नेण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात तीन आरोपींवर हल्ला करण्याचे इंटेलिजन्स इनपुट मिळाले आहेत. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी त्याच्या तपासाचा भाग म्हणून लवकरच गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

राज्यातील शाळेची घंटा १५ जूनला वाजणार

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

धक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात

उत्तर प्रदेशातले नामचीन गुंड अतीक – अश्रफ बीडमध्ये ठरले ‘शहीद’

प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलबाहेर १५ एप्रिलच्या रात्री गँगस्टरमधून राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हत्येप्रकरणी दोन्ही भाऊ पोलिस कोठडीत असून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. अतीक आणि अश्रफ रुग्णालयाबाहेर माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधत असताना पत्रकारांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून लवलेश तिवारी, अरुणकुमार मौर्य आणि सनी या तीन हल्लेखोरांना अटक केली.

Exit mobile version