पुणे शहरात भरदिवसा सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर अज्ञातांकडून शुक्रवार, १२ मे रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. आधी त्यांच्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले गेले. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
हल्ला करणारे चार जण असल्याचे म्हटले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. हा हल्ला कोणी केली आणि त्याचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून लढा देत होते. त्याचा संदर्भ या हल्ल्याशी आहे का? याचा तपास करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे
‘द केरळ स्टोरी’ची शालिनी उन्नीकृष्णन सापडली!
‘कोणाचेच घर वाचणार नाही’- इम्रानच्या सुटकेनंतर पाकिस्तानच्या मंत्री बोलल्या
इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय
कोण होते किशोर आवारे?
किशोर आवारे हे पिंपरी चिंचवड येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. किशोर आवारे यांना पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. करोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून उल्लेखनीय मदतकार्य केले होते.