आसामच्या गुवाहाटीजवळील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याला गुरुवारी (१२ सप्टेंबर) हिंसक वळण लागले. अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यास गेलेल्या पोलीस, अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मुस्लीम जमावाने हल्ला केला. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला. हैदर अली आणि जुवाहद अली अशी दोन मृतांची नावे असून, गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी गुवाहाटीच्या पूर्व उपनगरातील सोनापूर भागातील कचुतली गावात कारवाई करण्यास पोहचले तेव्हा हिंसाचार सुरू झाला. परिसरातील तब्बल १०० बिघा (३३ एकर) सरकारी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा मिळविलेल्या वसाहतींना हुसकावून लावण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. मुस्लीम समाजातील सुमारे १५० लोक या परिसरातील सरकारी जमिनीवर स्थायिक झालेत. प्रशासनाच्या कारवाई दरम्यान गुरुवारी हजाराहून अधिक लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी सज्ज पोलिसांवर हल्ला केला.
जमावाने पोलिस कर्मचारी आणि वाहनांवरही दगडफेक करून अनेक वाहनांचे नुकसान केले. या हल्ल्यात एका महिला कॉन्स्टेबलसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाच्या हल्ल्यात महसूल मंडळ अधिकारी नितुल खतोनियार हेही जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणता न आल्याने पोलिसांना जमावावर गोळीबार करावा लागला आणि हल्लेखोरांना गोळ्या घातल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमाव इतका हिंसक होता की पोलिसांना घटनास्थळावरून पळ काढावा लागला.
हे ही वाचा :
अरविंद केजरीवाल जामीनावर येणार तुरुंगातून बाहेर
पंतप्रधान मोदींची कझानमध्ये वाट बघतोय… पुतीन यांच्याकडून ब्रिक्स परिषदेसाठी विशेष निमंत्रण
ओडिशा सरकाराचा निर्णय; युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये अग्नीवीरांसाठी १० टक्के आरक्षण
न्या. चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी केलेल्या गणपतीच्या आरतीमुळे विरोधक सैरभैर
पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या हल्लेखोरांना सोनापूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. हैदर अली आणि जुवाहीद अली अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या हल्ल्यात जखमी महिला कॉन्स्टेबलने सांगितले की, जमावामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. जमावाने दगड, चाकू, काठ्या आणि इतर शस्त्रे वापरून हल्ला केला.
दरम्यान, बेकायदा वसाहतींनी सरकारी जमीन आणि आदिवासी पट्ट्यातील भूभागावर कब्जा केल्याची स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर हे निष्कासन मोहीम सुरू करण्यात आली. तक्रारींनंतर प्रशासनाने परिसरात सर्वेक्षण केले, कागदपत्रे तपासली असता, सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांना घरे रिकामी करण्यासाठी अनेक नोटिसा बजावल्या. मात्र रहिवाशांनी स्वतःहून जागा रिकामी करण्यास नकार दिला, यानंतर प्रशासनाने तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली.