‘चोरी, दरोडा, बलात्कार आणि लुटीचे गुन्हे करणाऱ्यांत आणि तुरुंगात जाणाऱ्यांमध्येही मुस्लिमांचा पहिला क्रमांक आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ)चे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. पक्षाध्यक्ष बद्रुद्दीन अजमल हे अत्तराचे मोठे उत्पादक आहेत. आसाममधील बंगालीभाषिकांमध्ये त्यांचे प्राबल्य आहे. आसामच्या १२६ विधानसभा सदस्यांपैकी १५ आमदार एआययूडीएफचे आहेत.
‘आपल्या मुलांना शाळा, कॉलेजात जायला वेळ मिळत नाही. पण त्यांना जुगार खेळायला, दुसऱ्यांना फसवायला आणि बाकी चुकीच्या गोष्टी करायला बरोबर वेळ मिळतो. सर्व चुकीच्या गोष्टींत कोणाचा सहभाग असतो. तर मुस्लिमांचा. आणि हे दुःखद आहे,’ असे ते एका प्रचारसभेत म्हणाले होते. त्यासाठी त्यांनी गुन्ह्यांमध्ये मुस्लिमांचा सहभाग अधिक असल्याचा उल्लेख केला. मात्र या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असला तरी शुक्रवारीही ते त्यांच्या मतावर ठाम होते.‘मी काही चुकीचे बोललेलो नाही. गुन्ह्यांमधील अधिक सहभाग हे थेट शिक्षणाच्या अभावाशी निगडित आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य
‘बागेश्वर बाबां’च्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध!
पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक; भारतानेही पाच-सात पाक रेंजर्स टिपले
१,६०० कोटी रुपयांची फसवणूक; अशोका विद्यापीठाचे संस्थापक ईडीच्या निशाण्यावर!
‘जगभरात मुस्लिम समाजात शिक्षणाचा अभाव असल्याचे मी पाहिले आहे. आपली मुले शिकत नाहीत, उच्च शिक्षणाकडे वळत नाहीत, इतकेच काय साधे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत नाहीत, हे बघून मला खूप वाईट वाटते. तरुणांना शिक्षणाचे महत्त्व पटावे, म्हणून मी तसे बोललो,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुलींकडे पाहताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना मुले आणि पुरुषांनी वाईट हेतू मनात ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
‘मुस्लिमांमध्ये साक्षरतेचा मोठा प्रश्न आहे. ते सुशिक्षित नाहीत. आपण शिक्षणाचा मुद्दा काढल्यास सरकारला दोष देतो. पण जर त्यांनी आपल्या अल्पसंख्याकांच्या भागातून डॉक्टर, इंजिनीअर मागितले तर दुर्दैवाने आपण त्यांना देऊ शकत नाहीत. आपण साक्षरतेचा दर वाढवला पाहिजे. आपल्या तरुणांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. सर्व वाईट गोष्टी या शिक्षणाच्या अभावामुळेच होतात,’ असेही ते म्हणाले.