क्रूज ड्रग्स प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात हजेरी लावली आहे. आर्यन खान हा क्रूज ड्रग्स प्रकरणात सध्या जामिनावर मुक्त आहे. हा जामीन सशर्त स्वरूपाचा आहे. न्यायालयाने आर्यन खानसमोर १४ अटी ठेवल्या असून या अटी मान्य केल्या नंतरच आर्यन खानची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
एनसीबीने न्यायालयात आर्यन खानच्या व्हॉट्सॲप चॅट्सद्वारे दावा केला होता की तो बेकायदेशीर ड्रग डीलमध्ये सामील होता आणि परदेशी ड्रग्सची तस्करी करण्यातही त्याचा सहभाग होता. मात्र, आर्यनकडे ड्रग्ज सापडले नव्हते. त्यामुळे ३० ऑक्टोबर रोजी तब्बल २७ दिवसांनी आर्यन खानला जामिन मंजूर केला गेला. त्या शिवाय त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
आदिगुरू शंकराचार्यांचे ध्यानस्थ शिल्प देशाला अर्पण
आर्यन खानच्या जामिनाच्या अटीत म्हटले आहे की, पोलिसांना कळवल्याशिवाय आर्यन खान मुंबई सोडू शकत नाही. तर प्रत्येक शुक्रवारी त्याला एनसीबी कार्यालयात येऊन हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे. जामिनाच्या या १४ अटींपैकी एकाचेही उल्लंघन झाले तरि एनसीबी आर्यन खानचा जामिन रद्द करावा यासाठी तात्काळ न्यायालयात अर्ज करू शकते.
दरम्यान या प्रकरणात एनसीबीचा तपास अद्याप सुरु आहे. त्यामुळे देशभर गाजणाऱ्या या हाय प्रोफाईल केसमध्ये एनसीबीच्या तपासातून नवे काय समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.