आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी यासंबंधीचा तपास अहवाल सादर केल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे. व्ही. व्ही. सिंग आणि आशिष रंजन प्रसाद अशी निलंबन करण्यात आलेल्या दोन एनसीबी अधिकाऱ्यांची नावे आहेत.
मुंबईतील कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपास पथकात या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मुख्य तपास अधिकारी तथा अधीक्षक व्ही. व्ही. सिंग आणि इंटेलीजेन्स अधिकारी आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. तपासातील त्रुटी आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवत या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पाकिस्ताननंतर श्रीलंकेच्या संसदेत येणार अविश्वास ठरावाचा प्रस्ताव
गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध
श्रीलंकेपाठोपाठ नेपाळचाही घात; त्यात चीनचा हात
दरम्यान, ३ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीच्या पथकाने मुंबई विभागीय माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याचा दावा करत आर्यन खान याच्यासह अनेकांना क्रूझवरून ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण मिळून राजकीय वर्तुळातून एनसीबीच्या कारभारावर टीका करण्यात आली होती. तपासानंतर १९ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आर्यन खान तसेच त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.