क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्यासह ३ जणांना एनसीबीने अटक केली आहे. एनडीपीएस ऍक्टच्या ८सी, २० बी, २७ आणि ३५ या भारतीय दंड विधान कलमाखाली आर्यन आणि इतर दोघांना ही अटक करण्यात आली आहे. संध्याकाळी ७ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
इतर ४ जणांची चौकशी सुरू असून त्यांना देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. आर्यन यांच्याकडे सापडलेल्या ड्रग्सबाबत त्याने एनसीबीकडे कबुली दिली असल्याचे समजते. त्याच्याकडे सापडलेले ड्रग्स हे सेवन करण्यासाठी आणले असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांना जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्यात आले आहे, तेथून त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला एनसीबीने रात्रीच ताब्यात घेतले होते. शनिवारी रात्री क्रूझवर घातलेल्या छाप्यात रेव्ह पार्टीचे आयोजन केले गेल्याचे एनसीबीला लक्षात आले. त्यात आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात आर्यन खानचा समावेश होता. शाहरुखच्या मुलाचा समावेश असल्याची पुष्टी होत नव्हती पण नंतर त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आता एनसीबीने त्याला अटक केली आहे.
हे ही वाचा:
आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?
कोटी कोटी कर्जात बुडालेल्या एसटीसाठी कोटिंगचा अट्टहास
देगलूरमध्ये होणार पंढरपूरची पुनरावृत्ती? सुभाष साबणे यांना भाजपाची उमेदवारी
मुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष
यानिमित्ताने पुन्हा एकदा एनसीबीच्या ड्रग्स माफियांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. बेलापूर येथे एनसीबीने छापेमारी केली आहे. या अटकेनंतरच ही नवी माहिती एनसीबीला मिळाली आहे.
सदर कॉर्डेलिया क्रूझच्या व्यवस्थापनाने मात्र आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. आम्ही अशा प्रकारच्या कृत्यांना थारा देत नाही आणि यानंतरही देणार नाही, असे व्यवस्थापनाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.