दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तुरुंगात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अपीलवर ईडीला नोटीस पाठवली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी कोणताही दिलासा दिलेला नाही. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ईडीला २४ एप्रिलपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. तर, केजरीवाल यांना २७ एप्रिलपर्यंत ईडीच्या उत्तराला उत्तर द्यावे लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान अरविंद केजरीवाल यांचे वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे आणि पक्षासाठी उमेदवार निवडतानाही त्यांचा सल्ला आवश्यक आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, २९ एप्रिल रोजी होणाऱ्या चर्चेसाठी त्यांनी युक्तिवाद जतन करावा. सिंघवी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या सुनावणीला गती देण्याचे आवाहन केले, त्यावर न्यायालयाने म्हटले की, २९ एप्रिलपूर्वी वेळ देता येणार नाही.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ईडीच्या कारवाईचे समर्थन कार्य अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला वैध ठरवले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा म्हणाले होते की, “हा केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यातील मुद्दा नसून हे प्रकरण ईडी आणि केजरीवाल यांच्यातील आहे. केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कुणालाही विशेषाधिकार देता येणार नाही. त्यांना अटक करण्यासाठी ईडीकडे पुरेसे पुरावे आहेत. तपासात मुख्यमंत्र्यांना चौकशीतून सूट देता येणार नाही.
हे ही वाचा:
मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!
तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट
“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”
राजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. आता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना तिहार जेलमधून व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून राउस ऍव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आले. येथे त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.